बुधवार, १५ सप्टेंबर, २०१०

युवकांमधील घटस्फोटांची संख्या वाढली

पुणे  -  करिअरच्या मागे धावण्याच्या शर्यतीमधून विवाहसंस्थेला हादरे बसत असून 25 ते 35 वर्षे वयोगटातील युवक-युवतींचे परस्परसंमतीने घटस्फोट मागण्याचे प्रमाण वाढत आहे. या संदर्भात गेल्या पाच वर्षांत दाखल झालेल्या दाव्यांच्या संख्येचा आढावा घेतल्यावर, न्यायालयात दाखल झालेल्या अर्जांमध्ये साठ टक्के अर्ज या वयोगटातून दाखल करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

घटस्फोटासाठी न्यायालयात सादर होणाऱ्या अर्जांचे प्रमाण सध्या वाढत आहे. एकतर्फी घटस्फोट मागणे किंवा पोटगीसाठी दाखल होणाऱ्या दाव्यांचीही संख्या वाढली असली, तरी त्यात परस्परसंमतीने घटस्फोट मागण्याचेही प्रमाण सर्वाधिक आहे. परस्परसंमतीने घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, बीपीओ किंवा चांगल्या पदावर नोकरी करणाऱ्या युवक-युवतींचा समावेश आहे. गेल्या वर्षी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी सुमारे 1300 दावे दाखल झाले होते. त्यातील 980 दावे हे परस्परसंमतीने घटस्फोट मागणाऱ्यांचे आहेत. लग्नानंतर एक-दोन वर्षांतच घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण त्यात जास्त आहे.

भारतीय विवाह संस्था जगात आदर्श समजली जाते; परंतु आधुनिकीकरणाचे या संस्थेला धक्के बसत आहेत. परस्परांमध्ये संवादाचा अभाव, एकमेकांना वेळ देता न येणे, घरात दोघे जणच राहणे, अहं (इगो), कामावरील ताण, करिअरबद्दलच्या अपेक्षा, वैद्यकीय समस्या आदी विविध कारणांमुळे युवकवर्गातील घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. शिक्षण, चांगल्या पगाराची नोकरी यामुळे त्यांच्या स्वतःबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. चांगले पर्याय मुबलक मिळू शकतील, असे वाटत असल्यामुळे घटस्फोट मागण्याचा त्यांचा विचार प्रबळ होतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ विवाह समुपदेशकांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. महिलांमधील उच्च शिक्षणाचेही प्रमाण वाढत असल्यामुळे व त्यानंतर त्यांना चांगल्या पदावर, भरघोस पगाराची नोकरी मिळत आहे. त्यामुळे जोडीदाराकडून त्यांच्या अपेक्षा बदलल्या आहेत. परंतु, पुरुषप्रधान मानसिकतेमुळे जोडीदाराला त्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत. परिणामी विसंवाद निर्माण होतो व त्याची परिणती घटस्फोटात होते, हेही वाढत्या दाव्यांमधील युवकांच्या घटस्फोटाचे प्रमुख कारण आहे.

घटस्फोटाचा दावा संमतीने दाखल केल्यास सहा महिने विभक्त राहावे लागते. त्या काळात त्यांचे समुपदेशन होते. परंतु, या प्रक्रियेतून घटस्फोटाचा निर्णय रद्द होण्याचे प्रमाण अपवादात्मक आहे. लग्नानंतर काही काळ बरोबर राहिल्यानंतर परस्परांत विसंवाद निर्माण झाला आहे, असे वाटल्यावर युवकांत घटस्फोटाचा विचार प्रबळ होतो. त्यामुळे मूल होऊ देण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. तसेच परस्परांच्या संपत्तीमध्ये हक्क सांगण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आर्थिक प्रश्‍न कसा सोडवायचा, याचा निर्णय तेच घेतात व त्याची माहिती न्यायालयाला देतात, असेही अनेक प्रकरणांत दिसून आले आहे. मूळबाळ नसल्यामुळे व परस्परांबरोबर राहायची इच्छा नसल्यामुळे न्यायालयाकडूनही घटस्फोट त्यांना लवकरच मिळतो, असेही समुपदेशकांनी सांगितले.

याबाबत एक उदाहरण बोलके आहे. युवक-युवती महाविद्यालयापासून मित्र होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगल्या पदावर त्यांना नोकरी मिळाली. दोघांचेही उत्पन्न दरमहा सव्वा लाख रुपयांपर्यंत होते. परंतु, दोघे जण सकाळी आठ वाजता घराबाहेर जात व सायंकाळी सात वाजता परतत. दोघांच्याही कामावर जाण्याच्या वेळेमुळे त्यांना घरकामाला बाई मिळाली नाही. घरात आल्यावर सर्व कामे युवतीलाच करावी लागत. दोघे जण सारखेच कमावतो, तर घरकामही दोघांनीच केले पाहिजे, असे तिने पतीला सांगितले; परंतु त्याने त्यास नकार दिला. या कारणावरून दोघांनीही लग्नानंतर दीड वर्षांच्या आतच परस्परसंमतीने घटस्फोट घेतला.

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ