आपल्या प्रत्येक हालचालीमागे स्नायूंचे आकुंचन (आणि प्रसरण) महत्त्वाची कामगिरी बजावत असते. आपल्या इच्छेनुसार होणाऱ्या हालचाली ऐच्छिक असतात, उदाहरणार्थ : उठणे, बसणे, बोलणे, चालणे, हातपाय हलविणे याखेरीज काही हालचाली अनैच्छिक असतात. उदा. रुधिराभिसरणाकरता लागणाऱ्या हृदयाच्या आकुंचनाची गती किंवा शक्ती. अन्नाचे पचन होत असताना, अन्न आतड्यात पुढे योग्य गतीने जाणे. डोळ्यांत प्रकाश किती जावा, हे ठरविण्याकरता डोळ्यांतील बाहुलीचा आकार ठरविणारे स्नायू यांचे कार्य इत्यादी आपल्या शरीरात ऐच्छिक कार्य करणारे 600 स्नायू असतात. या ऐच्छिक कार्याला जबाबदार असणाऱ्या स्नायूंच्या अकस्मात अतिरेकी अनैच्छिक आकुंचनामुळे खूप वेदना येतात व स्नायूंचा एक घट्ट गोळा बनतो. असे गोळे काही ऐच्छिक क्रिया करण्याची सुरवात करताना येतात; परंतु कधी कधी विश्रांती घेतानासुद्धा येऊ शकतात. सहसा थोड्या वेळाने असा गोळा जातो.
रात्री झोपेत पायाच्या पिंढरीचा (पोटरीचा) स्नायू असा आकुंचित पावल्याने गोळा येणे, हा अनेकांना आलेला अनुभव असेल. असा गोळा आल्यावर तो घालविण्यासाठी हळुवारपणे संबंधित स्नायू ताणला जाणे आवश्यक असते. पोटऱ्यांत आलेला गोळा घालविण्यासाठी बिछान्यातून उठून दोन्ही तळपाय जमिनीवर टेकलेल्या स्थितीत उभे रहावे. बिछान्यात पडल्या पडल्या मसाज करण्याने गोळा जाणार नाही. उभे राहिल्यामुळे पिंढरीचा स्नायू ताणला जातो व गोळा जातो.
कोणताही आजार नसणाऱ्या व्यक्तीला (निरामय स्थितीत) असा गोळा येणे शक्य आहे. गर्भवती स्त्रीला हातापायाच्या स्नायूंना व बोटांच्या स्नायूंना गोळे येतात. त्याचा संबंध कॅल्शिअम कमतरतेशी असू शकतो. गर्भवती व स्तनदा (दूध पाजणाऱ्या) मातेची कॅल्शिअम गरज जवळजवळ दुप्पटीने वाढलेली असते. दुधातून मिळणारे कॅल्शिअम हा कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहे. तृणधान्यांत फायटिक ऍसिड (phytic acid) असते. त्याचा व कॅल्शियमचा संयोग होतो. परिणामी, तयार झालेले कॅल्शिअम फायटेटचे (calcium phytate) रेणू शोषले जात नाहीत. त्याचप्रमाणे अळू आणि पालक यांत ऑक्झालेटचे (oxalate) रेणू असतात. त्यामुळे कॅल्शिअम ऑक्झालेट (calcium oxalate) तयार होते. ते शोषले जात नाही. जीवनसत्त्व ड (vitamin D) आहारात असणे कॅल्शिअम शोषणासाठी गरजेचे असते. दुधातून जीवनसत्त्व "ड' भरपूर मिळते. बहुतेक कॅल्शियमच्या गोळ्यांत कॅल्शिअम व जीवनसत्त्व ड 3, (vitamin D3) एकत्र असते. कॅल्शियमप्रमाणे मॅग्नेशियमच्या (चरसपशीर्ळीा) अभावाने स्नायूंचे गोळे येऊ लागतात. तृणधान्ये, शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ते, केळी, कोबी, फ्लॉवर यांतून मॅग्नेशियम मिळते.
उलट्या, जुलाब होत राहिल्या व शिरेतून सलाईन देताना मॅग्नेशियम दिले गेले नाही तर मॅग्नेशियमचा अभाव होतो. रुग्णाला खूप थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, खिन्नता येते, नाडीचे ठोके अनियमित पडू लागतात. काही व्यक्तींना दीर्घकाळ थकव्याचा त्रास (chronic fatigne syndrone) होतो. आठवड्यातून 1 असे 6 आठवडे मॅग्नेशियमचे इंजेक्शन दिल्याने हा थकवा दूर होतो. शरीरातील सोडियमक्षार कमी होणे हे स्नायूंचे गोळे येण्याचे एक प्रमुख कारण आहे. भारतीय आहारात मिठाचे प्रमाण भरपूर असते. (साडेसात ते 10.0 ग्रॅम रोज) ज्या व्यक्तींना खूप घाम येतो, त्यांना जास्त मिठाची गरज असते. अनेक रुग्णांना (अंगावर सूज असताना, रक्तदाब वाढलेला असताना, काही मूत्रपिंडाच्या, यकृताच्या आणि हृदयाच्या आजारात) मीठ कमी घेण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय लघवी जास्त व्हावी म्हणून औषधे द्यावी लागतात (diuretin). अशा परिस्थितीत जुलाब झाले तर सोडियम क्षार एकदमच कमी होतो. रुग्णाला थकवा येतो. पोटऱ्यात व स्नायूत गोळे येतात. तोंड कोरडे पडते. मन गोंधळते. अशा रुग्णांना रुग्णालयात ठेवून काळजीपूर्वक सोडियम क्षाराची भरपाई करावी लागते.
बऱ्याच दिवसांनी व्यायाम सुरू करताना काळजी घ्यावी लागते. धावणाऱ्या आणि पोहणाऱ्या व्यक्तींनी याची जाण ठेवावी लागते. माफक सुरवात करून आपली तंदुरुस्ती हळूहळू वाढवीत जाणे जरूर असते. मॅरेथॉन रेसमध्ये भाग घेणे किंवा धरमतर ते गेटवे ऑफ इंडियाचे अंतर पोहणे यासारख्या शर्यतीत भाग घेण्याकरिता कित्येक महिन्यांचा सराव लागतो. हाताच्या बोटांचा व बाहूंच्या स्नायूंचे गोळे लिहिताना येतात, त्यांना लेखनिकांना येणारे गोळे म्हणतात.
हा एक प्रकारचा मेंदूच्या बेझल गॅंदिया नावाच्या (basal ganglis) भागातील कार्याच्या दोषाचा परिणाम असतो. त्याला डिस्टोनिया (dystonis) म्हणतात. मेंदूच्या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर याकरिता बोटुलिनियम (Botulinium) चा वापर यशस्वीरीतीने करतात. काहींना हॅलोपॅरिडॅल (Haloparidal) या औषधाचाही फायदा होतो. हे उपचार फक्त तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येतात.
स्नायूंना रक्ताचा पुरवठा कमी पडला, की स्नायू एकाएकी आकुंचित होतात. पायाच्या रक्तवाहिन्यांतील दोष हे कारण असू शकते. रोहिणीकाठिण्यामुळे पायाला जाणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या तर ठराविक अंतर चालून गेल्यावर पायाच्या स्नायूना वेदना येतात व व्यक्तीला पुढे चालता येत नाही. पायाच्या तपासणीत रक्तवाहिन्यांचे स्पंदन मंदावल्याचे समजते. डॉप्लर नावाच्या तपासणीत याचे निदान निश्चित करता येते. एका वेळेस 25 ते 30 मिनिटे आठवड्यातून 4 वेळा संथगतीने सपाटीवर चालण्याने हा दोष काबूत आणण्यास मदत होते. काही अंतग्रंथींच्या विकारात स्नायूंना लवकर गोळे येतात. विशेषतः थायरॉईड ग्रंथीचे कार्य नीट चालले नाही, तर आकुंचन पावलेला स्नायू त्याच स्थितीत राहतो. मायोटोनिया (myotonis). थॉयरॉड या औषधाच्या गोळीने हा अभाव भरून काढता येतो. भराभर श्वास घेण्याने रक्तातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण उतरते. रक्तातील अल्कलॅनिटी (alkalanity) वाढते. त्यामुळे स्नायूंना गोळे येतात. काही व्यक्तींना इतरांचे लक्ष आपल्याकडे ओढून घेण्याची विकृती झालेले असते.(Hysteris : conversion a somalizatia) अशा व्यक्ती मानसिक तणावाखाली भराभर श्वास घेऊ लागतात (hypervenlilation). हातापायांना मुंग्या येतात, बोटे वाकडी होतात (Tetany). मूत्रपिंडांच्या दीर्घकाळ चालू राहणाऱ्या आजारात रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण घटते व अशी स्थिती वारंवार होऊ लागते.
निरामय स्थितीत असताना भर दुपारी उन्हात काबाडकष्ट करणाऱ्या वाळवंटासारख्या प्रदेशातील मजदुरांना शरीराचे तापमान नीट ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन करावे लागते, सपाटून घाम सुटत असते, तहान खूप लागते व पाणी सारखे प्यावेसे वाटते. पाण्याची कमतरता भरून निघते; परंतु घामाबरोबर बाहेर पडलेला सोडियम क्षार मिळत नाही. हातापायाच्या स्नायूंचे गोळे येऊ लागतात. अशावेळी पाणी व मीठ यांची भरपाई फार काळजीने करावी लागते. खूप घाईने मीठ देणे किंवा पाणी देणे दोन्ही अपायकारक ठरू शकतात. मेंदू व मज्जारज्जूच्या अनेक विकारांत स्नायूंचे गोळे येतात. हातापायाला जाणाऱ्या मज्जातंतूंच्या शिरांचे आजार (peripheral neurilis) अनेक मधुमेही रुग्णांना व दीर्घकाळ मद्य सेवणाऱ्यांना होतात. या व्यक्तींना लहानसहान श्रमांनी पायातील स्नायूंचे गोळे येऊन वेदना होऊ लागतात. काही औषधांच्या वापरामुळे स्नायूंचे गोळे येतात.
लघवी जास्त व्हावी या करता वापरण्यात आलेल्या डाययुरेटिक्स (diureties) चा उल्लेख झालेला आहेत. दम्यावर वापरण्यात येणारी काही औषधे, कॉर्टिकोस्टेरॉईड्स, रक्तदाब कमी व्हावा म्हणून वापरण्यात येणारी कॅलशय चॅनेल अँटॅगोनिस्टस (नेफिडिपीत) यांनी असा त्रास होतो. फिनोथायाझीन जातीची औषधे मळमळ किंवा उलटी थांबविण्यास वापरतात. त्यांनी काहींच्या चेहऱ्यावरील स्नायूंच्या आकुंचनामुळे तोंड वाकडेतिकडे होऊ लागते. स्नायूंच्या आकुंचनामुळे गोळे येणे हा त्रासदायक विकार असतो. ऍलर्जीसाठी वापरात आणले जाणारे बेनाड्रिल (Benadry) हे अनेक वेळा उपयोगी पडते.
लेबल: आरोग्य